ताज्या घडामोडी

शिरूर पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’; दोन दिवसांत दोन पिस्तुले जप्त, तीन आरोपी गजाआड

निमोणे आणि सतरा कमान परिसरात पोलिसांचा धाडसी सापळा; गावठी कट्ट्यासह गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

शिरूर (प्रतिनिधी): शिरूर पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आक्रमक पाऊले उचलली असून, गेल्या ४८ तासांत दोन मोठ्या कारवाया करत तीन आरोपींना अटक केली आहे. या धडाकेबाज मोहिमेत पोलिसांनी दोन अवैध गावठी बनावटीचे पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे, एक फोर्ड फिगो कार आणि एक पल्सर मोटारसायकल असा एकूण ३,४५,५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पहिली कारवाई: निमोणे येथे कारमध्ये सापडले पिस्तुल

दिनांक १३ मार्च २०२६ रोजी रात्री ९:०० च्या सुमारास पोलीस हवालदार विशाल कोथळकर यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. निमोणे (ता. शिरूर) येथील नागेश्वर विद्यालयासमोर एक पांढऱ्या रंगाची फोर्ड फिगो कार (क्र. MH 12 HL 3114) संशयास्पदरीत्या उभी असून, त्यातील तरुणांकडे शस्त्रे असल्याची खात्री झाली.

पोलीस निरीक्षक संदेश केजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. यावेळी कारमधील समीर प्रकाश शेलार (वय २३) आणि संपत गणपत दुर्गे (वय ३५, दोन्ही रा. निमोणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गाडीची झडती घेतली असता, हँडब्रेकच्या खाली लपवून ठेवलेले एक गावठी पिस्तुल आणि मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस मिळून आले. या दोघांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दुसरी कारवाई: फिल्मी स्टाईल पाठलाग आणि सराईत गुन्हेगाराला अटक

दुसरी कारवाई १४ मार्च रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास घडली. पोलीस अंमलदार नितेश थोरात आणि सचिन भोई पेट्रोलिंग करत असताना, त्यांना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नवनाथ गोरडे (रा. शिर्डी) हा शस्त्रासह शिरूरमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली.

शिरूर येथील सतरा कमान पूल परिसरात पोलिसांनी सापळा लावला. बातमीनुसार मोटारसायकल येताच पोलिसांनी तिला थांबवण्याचा इशारा केला, मात्र आरोपींनी दुचाकी वेगाने पळवली. पोलिसांनी पाठलाग सुरू केला असता, नाना स्पॉट (ढाबा) डोंगराजवळ आरोपींची मोटारसायकल एका खाजगी वाहनाला धडकली. अपघातानंतर एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला, मात्र पोलिसांनी नवनाथ साहेबराव गोरडे (वय ३८, रा. पोहेगाव खुर्द, जि. अहिल्यानगर) याला झडप घालून पकडले. त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे सापडली. प्राथमिक चौकशीत हे पिस्तुल त्याने सागर बनसोडे (रा. राहता) याच्याकडून घेतल्याचे समोर आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पथकाचे कौतुक

ही यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या सूचनांनुसार, पोलीस निरीक्षक संदेश केजळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग, शुभम चव्हाण, विशाल कोथळकर, अक्षय कळमकर, नितेश थोरात, सचिन भोई, सुशिल सुळसुले, अंबादास थोरे, अजय पाटील, दादाराव नागरे, संदीप खेडकर, सागर बोराडे, विजय शिंदे, निखिल रावडे आणि रवींद्र काळे,नीरज पिसाळ यांनी मोलाची भूमिका बजावली.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.प्रसारित होणाऱ्या माहितीशी संपादक सहमत असतीलच असे नाही..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये