क्राईम न्युज
Trending
मालकाला मारायला आले अन् कामगाराचा घेतला जीव! कारेगाव येथील हत्याकांडाचा रांजणगाव पोलीस व LCB कडून पर्दाफाश; ५ आरोपी गजाआड
जागेच्या वादातून दिली हत्येची सुपारी, पण ओळख चुकल्याने निष्पाप कामगाराची डोक्यात गोळी झाडून हत्या; पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

पुणे / शिरूर (निर्भय न्यूज लाईव्ह वृत्तसेवा):

रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथे घडलेल्या खळबळजनक हत्याकांड प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि रांजणगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत ५ आरोपींना जेरबंद केले आहे. जागेच्या वादातून घरमालकाचा खून करण्यासाठी दिलेली सुपारी भलत्याच निष्पाप कामगाराच्या जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला आहे.

दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी कारेगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथील साईनगर परिसरातील ‘समु इंटरप्रायजेस ॲक्वा रिच’ या पाण्याच्या प्लांटमध्ये काम करणारे कामगार हामजा उस्मान शेख (वय ३९, मूळ रा. धानोरा काळे, ता. पूर्ण, जि. परभणी) हे नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्यावेळी अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची नृशंस हत्या केली होती. याप्रकरणी मयत हामजा यांच्या पत्नी सौ. अविताबी हामजा शेख (वय ३७) यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १०३ (१) व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाची चक्रे अन् धक्कादायक खुलासा:
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. रंजनकुमार शर्मा आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंग गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सार्थक संदेश कोहकडे याचा त्याच्या घरा शेजारी राहणारे विकास नवले यांच्याशी जागेचा वाद सुरू होता. याच वादातून सार्थक कोहकडे याने विकास नवले यांची हत्या करण्यासाठी तुषार तोडकर याला सुपारी दिली. तुषारने पिंपरी-चिंचवड येथील सराईत तडीपार गुन्हेगार संतोष मांजरे याला हत्येचे कंत्राट दिले.
संतोष मांजरे व त्याच्या साथीदारांनी विकास नवले यांच्या पाण्याच्या प्लांटमध्ये जाऊन त्यांना मारण्याचा कट रचला. मात्र, २९ सप्टेंबर रोजी प्लांटवर विकास नवले आहेत असे समजून आरोपींनी भलत्याच व्यक्तीवर म्हणजेच तिथे काम करणाऱ्या हामजा उस्मान शेख यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली.

अटक करण्यात आलेले आरोपी:
१. सार्थक संदेश कोहकडे (वय २४, रा. कारेगाव, शिरूर)
२. तुषार अजय तोडकर (वय २६, रा. पेठ, आंबेगाव)
३. संतोष मधुकर मांजरे (वय ३७, रा. मांजरेवस्ती, खेड)
४. विठ्ठल नवनाथ पिकळे (वय २७, रा. कोरेगाव, खेड)
५. योगेश विलास इडोळे (वय २८, रा. वाशीम)
या गुन्ह्यातील इतर दोन पसार आरोपी पवन सुरेश हुंडारे आणि पृथ्वी उर्फ भय्या दत्तू जाधव यांचा पोलीस गांभीर्याने शोध घेत आहेत.

पोलीस पथकाची कामगिरी:
सदरची यशस्वी कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. कुमार कदम करत आहेत.




