ग्रामीण वार्ता
Trending

आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत! गावडेवाडीत ३०० कोंबड्यांचा फडशा; कळंब-शिंदेमळ्यात अखेर बिबट्या जेरबंद

पोल्ट्री फार्मची लोखंडी जाळी तोडून बिबट्याचा हल्ला; ४५ हजारांचे नुकसान, तर दुसऱ्या घटनेत ५ ते ६ वर्षांचा बिबट्या पिंजऱ्यात कैद!

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

मंचर / महाळुंगे पडवळ (विशेष प्रतिनिधी, निर्भय न्यूज लाईव्ह):

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. तालुक्यातील गावडेवाडी येथे रविवारी मध्यरात्री बिबट्याने एका पोल्ट्री फार्मवर हल्ला करून तब्बल ३०० कोंबड्यांना ठार केले, तर दुसरीकडे कळंब-शिंदेमळा परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला आहे.

गावडेवाडीत पोल्ट्री फार्मवर बिबट्याचा दणका

गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील गावठाणातील जुन्या प्राथमिक शाळेजवळ व्यावसायिक प्रवीण वायाळ यांचा पोल्ट्री फार्म आहे. रविवारी (ता. ४) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने या पोल्ट्री फार्मवर धाड टाकली. बिबट्याने फार्मची भक्कम लोखंडी जाळी तोडून आत प्रवेश केला आणि तेथील २० ते २२ दिवस वयाच्या सुमारे ३०० कोंबड्यांना ठार केले. या घटनेत प्रवीण वायाळ यांचे सुमारे ४५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. फार्ममध्ये जवळपास सहा हजार कोंबड्या होत्या. बिबट्याच्या डरकाळीमुळे परिसरात मोठी घबराट पसरली होती.

घटनेनंतर फार्मच्या लगतच्या परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. बिबट्याचा वावर स्पष्ट झाल्याने माजी सरपंच स्वरूपा गावडे व देवराम गावडे यांनी वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच मृत कोंबड्यांचा पंचनामा करण्यात आला असून नुकसानभरपाईची कारवाई सुरू करण्यात आली आहे. परिसरात वावरणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती मंचरचे वनपरिक्षेत्राधिकारी विकास भोसले यांनी दिली आहे.

पोल्ट्री फार्मची लोखंडी जाळी तोडून बिबट्याचा हल्ला; ४५ हजारांचे नुकसान, तर दुसऱ्या घटनेत ५ ते ६ वर्षांचा बिबट्या पिंजऱ्यात कैद!

दुसऱ्या एका घटनेत, कळंब-शिंदेमळा (ता. आंबेगाव) येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (ता. ४) पहाटेच्या सुमारास एक बिबट्या जेरबंद झाला. स्थानिक नागरिक नीलेश कळंबे यांनी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे सर्वात आधी पाहिले.

त्यानंतर वस्तीवरील नागरिकांनी तत्काळ वनपाल सोनल भालेराव यांना याबाबत माहिती दिली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. पकडण्यात आलेला बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे ५ ते ६ वर्षे असल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

एकीकडे बिबट्या जेरबंद झाल्याने कळंब परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला असला, तरी गावडेवाडीतील हल्ल्यामुळे शेजारील गावांमध्ये भीतीचे सावट कायम आहे. वनविभागाने या भागात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.प्रसारित होणाऱ्या माहितीशी संपादक सहमत असतीलच असे नाही..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये