ग्रामीण वार्ता
Trending
शिरूर तालुक्यात बिबट्याचा थरार! ५ वर्षांच्या बालिकेला झोपेतून उचलून नेले; पिंपळसुटीतील धक्कादायक घटनेत चिमुकलीचा मृत्यू.
निर्भय न्यूज लाईव्ह (विशेष वृत्त)

शिरूर / प्रतिनिधी:
शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे एका ५ वर्षीय चिमुकलीला बिबट्याने झोपेतून उचलून नेऊन ठार केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. भाग्यश्री संदीप वारे (वय ५ वर्षे)असे या घटनेत मृत्यू झालेल्या दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिरूर तालुका हादरून गेला असून परिसर सुन्न झाला आहे.

नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे करोडी (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी असलेले बाबासाहेब कोंडीबा वारे आणि त्यांचे कुटुंब सध्या पिंपळसुटी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या शेतात मजुरीचे काम करतात.
दिनांक २२ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री २:४० वाजेच्या सुमारास वारे कुटुंब मालकांच्या गोठ्यात झोपलेले असताना अचानक आवाज आल्याने बाबासाहेब वारे जागे झाले. त्यावेळी त्यांना बिबट्या ५ वर्षांची पुतणी भाग्यश्री हिला जबड्यात धरून घेऊन जाताना दिसला. त्यांनी तत्काळ मोठ्याने आरडाओरडा केला, मात्र बिबट्याने चिमुकलीला उचलून जवळच असलेल्या गणेश सोनवणे यांच्या ऊसाच्या शेतात पळवून नेले.

वनविभाग व ग्रामस्थांकडून शोधकार्य
घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी लगेचच शेतम मालक मच्छिंद्र भोसले, ग्रामस्थ व वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन ऊसाच्या शेतात शोधमोहीम राबवली. काही वेळानंतर चिमुकली भाग्यश्री गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली.
तिला तातडीने रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय, न्हावरे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासण्यापूर्वीच मृत घोषित केले.

पोलीस व वनविभागाची कारवाई
या प्रकरणी बाबासाहेब वारे यांनी दिलेल्या माहितीवरून शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर नं. ११९/२०२६ (बी.एन.एस.एस. कलम १९४) अन्वये नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे (बॅच नं. २४६३) करत असून दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार खेडकर (बॅच नं. ३३२८) यांनी काम पाहिले.
ग्रामस्थांची मागणी:
शिरूर आणि परिसरात बिबट्यांचा वावर सातत्याने वाढला आहे. या घटनेमुळे शेतमजूर आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने तातडीने पिंजरा लावून संबंधित बिबट्याला गजाआड करावे, अशी जोरदार मागणी पिंपळसुटी व परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.




