सन्मान कर्तव्याचा
Trending
गुन्हेगारांचे कंबरडे मोडले! शिरूर पोलिसांची वर्षभरात २१ कोटींचे ड्रग्ज आणि १६ पिस्तुले जप्त करत मोठी कारवाई
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली संघटित टोळ्यांवर 'मिनी मोक्का'चा बडगा; ४,७०० हून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शिरूर (प्रतिनिधी):
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी गेल्या वर्षभरात (सन २०२४-२६) गुन्हेगारांविरुद्ध आक्रमक मोहीम उघडली आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अमली पदार्थ, अवैध अग्निशस्त्रे आणि संघटित गुन्हेगारीवर प्रहार करत तब्बल २१ कोटी रुपयांचे एम.डी. ड्रग्ज जप्त करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

अमली पदार्थ आणि अग्निशस्त्रांविरुद्ध मोठी मोहीम
अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात केलेल्या ८ कारवायांमध्ये ३ लाख १४ हजार रुपयांचा गांजा जप्त करून १३ जणांना अटक करण्यात आली आहे. सर्वात मोठी कारवाई एम.डी. ड्रग्ज प्रकरणात झाली असून, २१ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करत १० आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच, अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करत १६ गावठी पिस्तुले आणि २३ जिवंत काडतुसे जप्त केली असून, याप्रकरणी २३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संघटित गुन्हेगारीवर ‘मिनी मोक्का’ आणि तडीपारी
शहरातील वारंवार गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १११ आणि ११२ (मिनी मोक्का) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आंबळे येथील दरोडा टाकणारी टोळी, जुगार चालवणारी टोळी आणि बिअर शॉपी फोडणाऱ्या टोळ्यांचा समावेश आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना दणका दिला आहे.गुन्हे करणारे, खंडणीखोर आणि शेतीपंप चोरणाऱ्या ७ जणांच्या टोळीसह एकूण १६ गुन्हेगारांना पुणे जिल्हा आणि शेजारील अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

अवैध दारू आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन
अवैध दारू धंद्यांवर १३४ कारवाया करून पोलिसांनी ७८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहतूक शिस्तीसाठी देखील पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत:
ब्लॅक फिल्म आणि फॅन्सी नंबर प्लेट:
१२४ कारवर ब्लॅक फिल्म काढल्याची कारवाई करून १.४० लाख दंड वसूल केला, तर १६५३ फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर ८.६५ लाखांची दंडात्मक कारवाई केली.

बुलेट सायलेन्सरवर रोडरोलर:
कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ६८ बुलेट्सवर कारवाई करत ३५ सायलेन्सर रोडरोलर फिरवून नष्ट करण्यात आले.
एकूण दंड:
वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या १०,६८९ वाहनांवर कारवाई करून एकूण १ कोटी १८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.




