गुन्हे
Trending
शिरूरमध्ये प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधी तंबाखूवर छापा; अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई

शिरूर (पुणे):दिनांक २१/०४/२०२६
शिरूर शहरातील रेव्हेन्यू कॉलनी रोड परिसरात प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधी तंबाखूची विक्री करणाऱ्या एका जनरल स्टोअर्सवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छापा टाकला आहे. या कारवाईत विमल, रजनीगंधा, आरएमडी यांसारख्या विविध कंपन्यांचा सुमारे ५ हजार ३७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूरमधील धारिवाल हॉस्पिटल शेजारी असलेल्या ‘आढाव जनरल स्टोअर्स’ मध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार, सोमवारी २० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:३५ च्या सुमारास अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सोमनाथ सावळे यांनी पथकासह या ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी अनिल दत्तू आढाव (वय ३८, रा. शिरूर, मूळ रा. माजनपूर, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले आहे.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
तपासणी दरम्यान दुकानात खालील प्रतिबंधित पदार्थांचा साठा मिळून आला:
पानमसाला: विमल (बिग व किंग पॅक), गोवा, डायरेक्टर, रजनीगंधा आणि आरएमडी पानमसाला.
तंबाखू: जी-१ जर्दा, शॉट ९९९ लक्झरी तंबाखू, व्ही-१ तंबाखू, तुलसी रॉयल जाफरानी जर्दा आणि एम-गोल्ड सुगंधित तंबाखू.
एकूण किंमत: बाजारभावाप्रमाणे या सर्व मालाची किंमत ५,०३७ रुपये इतकी आहे.

कायदेशीर कारवाई आणि कलमे
महाराष्ट्र शासनाने १६ जुलै २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार राज्यात पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, साठवणूक व विक्रीवर बंदी घातली आहे. या बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध “भारतीय न्यायसंहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६”च्या विविध कलमान्वये (कलम ५९ सह) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तपासाची व्याप्ती वाढणार:
“प्रतिबंधित अन्नपदार्थांचा राज्यातील चोरटा व्यापार थांबवण्यासाठी केवळ विक्रेत्यावर कारवाई करून न थांबता, हा माल पुरवणारे पुरवठादार, वाहतूकदार आणि उत्पादक साखळीचा सखोल तपास करण्यात येणार आहे,” अशी माहिती फिर्यादीत देण्यात आली आहे.




