गुन्हे
Trending
मांडवगण फराटा येथे क्रिकेटच्या बॅनरवरून राडा; दोन्ही गटांकडून गोळीबार, शिरूर पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल
निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा

शिरूर: तालुक्यातील मांडवगण फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट ग्राउंडवर गुरुवारी (१९ मार्च) सायंकाळी क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवर फोटो लावण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी आणि गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.
पहिली घटना: बॅनरवर फोटो नाही म्हणून वाद
पहिली फिर्याद मिथुन उर्फ अमोल आनंदा चौगुले (वय ३१, रा. मांडवगण फराटा) यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवर सुत्रधार शिंदे याचा फोटो न लावल्यामुळे वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी चौगुले आपल्या मित्रांसह भैरवनाथ ग्राउंडवर गेले असता, तिथे उपस्थित असलेल्या अक्षय पाटील व पप्पू कड यांनी वाद घालून पिस्तूलमधून चौगुले यांच्या दिशेने गोळीबार (राऊंड फायर) केला. तसेच सुत्रधार शिंदे, ऋतिक चव्हाण व इतरांनी दगडफेक करून शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलिसांनी भा.न्या.सं. कलम १०९, १८९, १९१ आणि आर्म ऍक्टनुसार सुत्रधार शिंदे, पप्पू कड यांच्यासह १०-१२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना: गोळीबारात तरुण जखमी
दुसरीकडे, अक्षय गोविंदा पाटील (वय २९, रा. तळेगाव ढमढेरे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वेगळीच हकीकत समोर आली आहे. अक्षय यांच्या म्हणण्यानुसार, अमोल चौगुले यांनी त्यांना फोन करून भांडण मिटवण्यासाठी मांडवगण फराटा येथे बोलावले होते. तिथे गेल्यावर चौगुले यांनी त्यांची कॉलर पकडून “आमच्या गावात यात्रा आहे, तुला काय करायचे आहे?” असे म्हणून वाद घातला. यावेळी संदीप गिरे यांनी पिस्तूल काढून अक्षय यांच्यावर गोळीबार केला. अक्षय जीव वाचवण्यासाठी पळत असताना अमोल चौगुले यांनी स्वतः पिस्तूल हातात घेऊन पुन्हा गोळीबार केला. यामध्ये एक गोळी अक्षय यांच्या उजव्या बरगडीला लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या ससून रुग्णालय, पुणे येथे उपचार सुरू आहेत.




